loading

पहाड आणि लेकरं …

स्थळ : पुणे . हिंजवडीतील एका 5 star, corporate hospital चा बाह्यरुग्ण विभाग . वेळ साधारण सकाळी ८:३० ची . पेशंट बघून लगबगीने OT त जायच्या तयारीत मी असताना एक walk in patient आल्याची receptionist ची वर्दी आणि माझी चिडचीड , हे नेहमीचंच .
माझ्यासमोर typical तरुण , या hospital मधे नेहमी आढळणार्या ढाचातलं corporate couple आलं . मुलीनी वडलांना दाखवायला माझ्याकडे आणलं होतं . वडिलांना बघितल्यावर मी गारच !! साधारण साठीतले गावाकडचे शेतकरी काका माझ्यासमोर येऊन बसले . त्या सर्वस्वी corporate वातावरणात पूर्णत: misfit असे ते आणि चपला घालून , त्यांच्याच भाषेत बोलणारा मी असे आम्ही दोघंच . त्यामुळेच एकमेकांसाठी कुतुहलाचे .
तपासून झाल्यावर operation चा निर्णय झाला आणि अख्खं पुणं फिरुन आलेल्या त्यांचा मीच operation करायचं हा पक्का निर्धार झाला . माझ्यासारख्या नवख्यासाठी हे जरा विशेषच . ॲापरेशन व्यवस्थित होऊन काका ICU मधे पोहोचले सुद्धा .
साधारण ३-४ दिवसांनी discharge ची वेळ आली . ठणठणीत बरे होऊन काका घरी जायच्या तयारीत . त्यांना माझ्याशी बोलायचं होतं . ते म्हणाले , “ मी इथे कसा ? हा तुमच्या डोळ्यातला प्रश्न मला जाणवला आणि त्याचं उत्तर हे तुम्हाला समजेल म्हणूनच . “ काकांनी नगर जिल्ह्यातलं गाव संसार पाठीशी बांधून , मुलांच्या शिक्षणासाठी उमेदीतच सोडलं आणि मुंबई गाठली . १५ वर्षं मुंबईत रिक्षा चालवली , मुलांचा शिक्षणाच्या खर्चं भागेना तशी पुन्हा पाथर्डी गाठली आणि शेतात राबायला चालू केलं . मुलं hostel ला राहून पुढचं शिक्षण घेत होती तेव्हा हा माणूस रानात ढोर मेहनत करत होता , पण त्यातही ५ बहिणींची लग्नं लावून देताना त्यांना रानात काम करू न देण्याचा अभिमान होताच . ही गोष्ट त्यांच्या तोंडून ऐकायचं नशीब मला लाभलं हा माझा बहुमानच!
आज त्यांची दोन्ही मुलं , जावई, सून हे सर्व post graduate engineers आहेत . फक्त पैसा न फेकता उशापायथ्याशी बसून त्यांची मदत आनंदानी करत आहेत , हे दृश्य तसं विरळाच . म्हणूनच ह्या पहाडासारख्या माणसाला आणि त्याच्या लेकरांना मनापासून सलाम !! आज त्या कुटुंबात रमलेल्या माणसाकडे पाहून होणारा आनंद हा काही वेगळाच …

Write a Reply or Comment

Your email address will not be published. Required fields are marked *